belgaum

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त कर्तव्यनिष्ठ जवानांना मानवंदना

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा पोलीस मुख्यालयात ‘पोलीस हुतात्मा दिन’ अत्यंत गांभीर्याने पाळण्यात आला. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त कर्तव्यनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित विशेष संचलनाला शहर व ग्रामीण भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिल्यानंतर पोलीस दलाच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गेल्या वर्षभरात देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या पोलीस जवानांच्या शौर्यगाथेचे स्मरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची भूमिका कणा समजली जाते, असे नमूद केले. “खाकी गणवेश हा केवळ एक पोषाख नसून तो सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा भक्कम आधार आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

 belgaum

तसेच, कठीण प्रसंगातही अहोरात्र सेवा बजावणारे पोलीस बांधव आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या कुटुंबांच्या त्यागाचे समाजाने सदैव स्मरण ठेवले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त केलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि आयजीपी संदीप पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कमर्चारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.