belgaum

काळया दिनाच्या पार्श्वभूमीवर म. ए. समितीची बैठक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: आगामी एक नोव्हेंबर काळा दिन जनजागृती आणि पूर्वतयारीबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मराठी भाषिकांवरील अन्याय, प्रशासनाची भूमिका आणि आगामी १ नोव्हेंबरच्या आंदोलनाची तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिन’ पाळण्यात येणार आहे. प्रशासनाची परवानगी असो वा नसो, समितीने ठरवून दिलेल्या ठिकाणी सर्व मराठी भाषिकांनी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी लवकरात लवकन उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीच्या भूमिकेची जाणीव करून दिली जाईल आणि मराठी जनतेची खरी ताकद दाखवून दिली जाईल, असे ठरवण्यात आले.


गल्लीबोळात बैठका घेऊन जनजागृती वाढवणार
शहरातील प्रत्येक परिसरामध्ये आणि चार-पाच गल्ल्यांच्या अंतराने छोट्या बैठका आयोजित करून तळागाळातील लोकांपर्यंत जनजागृती पोहोचवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिथे गरज असेल तिथे समितीचे प्रमुख पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. आंदोलनाची व्याप्ती वाढवून प्रशासनाला योग्य तो संदेश देण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

 belgaum

७० वर्षांचा लढा आणि मराठी जनतेची अढळ निष्ठा
म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, आमची जागृती नेत्यांच्या मतांवर अवलंबून नसून येथील मराठी जनतेचा उद्देश अत्यंत प्रामाणिक आहे. गेल्या ७० वर्षांपासून हा लढा कोणत्याही परिस्थितीत मागे हटलेला नाही. मराठा आरक्षण आंदोलनावेळी जशी बेळगावमध्ये अचानक प्रचंड गर्दी लोटली आणि पोलीसही चक्रावून गेले, तीच प्रवृत्ती मराठी अस्मितेच्या लढ्यातही कायम आहे. पोलिसांनी कितीही लाठ्या-काठ्या चालवल्या आणि मारहाण केली, तरीही बेळगावची जनता कधीही हरलेली नाही आणि आजही खंबीरपणे उभी आहे.

रणजीत चव्हाण-पाटील यांनी बैठकीत सांगितले की, विरोधकांना असे वाटत असले की आता हा लढा संपला आहे, परंतु हार मानणे आमच्या रक्तातच नाही. आपण अतिआत्मविश्वासात न जाता अत्यंत नम्रतेने, मात्र तितक्याच कणखरपणे या लढ्याला पुढे नेणार आहोत. गेल्या ५० वर्षांत घडले नाही, अशी एकजूट आणि वेळ आता आली असून सर्वांच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. तसेच सुप्रीम कोर्टातही यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

या बैठकीस ॲड. अमर यळ्ळूरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मांडोळकर, नेताजी जाधव यांच्यासह समितीचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.