कक्केरीच्या यात्रेचा आनंद क्षणात शोकात बदलला; हुलिकेरीतील इंदिरम्मा तलावात घडली हृदयद्रावक घटना
बेळगाव लाईव्ह : जत्रेचा उत्साह, नातेवाइकांची भेट आणि सणासुदीचे आनंदाचे क्षण… मात्र, नियतीच्या एका घावाने या आनंदावर दुःखाचे सावट पसरले. कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त नातेवाइकांकडे आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश केदार्जी पुजारी (वय १८, रा. तडकोड, ता. धारवाड) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी हुलिकेरी गावातील इंदिरम्मा तलावात ही दुर्दैवी घटना घडली.
कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त गणेश आपल्या नातेवाइकांच्या घरी हुलिकेरी येथे आला होता. सणानिमित्त कुटुंबीयांसमवेत तो तलाव परिसरात गेला होता. यावेळी पोहण्यासाठी तो तलावातील पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने घाबरून त्याचा बुडून मृत्यू झाला.
ज्या यात्रेसाठी गणेश आनंदाने नातेवाइकांकडे आला होता, त्याच परिसरातून त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी समोर आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सणाच्या आनंदासाठी एकत्र आलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा आघात झाला.

या घटनेमुळे हुलिकेरी आणि परिसरात शोककळा पसरली असून, अळणावर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
एका क्षणाचा आनंद आयुष्यभराची वेदना देऊन गेला… गणेशच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.





