बेळगाव लाईव्ह : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ६० ते ७० टक्के मतदारांचे डिजिटल नोंदणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेसच्या एआयसीसी सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली.
बेळगाव येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेतला.
डॉ. निंबाळकर यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार त्यांच्याकडे कित्तूर कर्नाटक विभागातील ८ ते १० जिल्ह्यांमधील एसआयआर प्रक्रियेच्या आढाव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार खानापूर येथे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, बेळगाव आणि चिक्कोडी जिल्ह्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत उर्वरित जिल्ह्यांचेही अहवाल मागविण्यात येणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांनी आपापले अहवाल सादर केले असून, केवळ अर्ज भरण्याचेच नव्हे तर मतदारांचे डिजिटल नोंदणीकरणही ६० ते ७० टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावमधील नागरिक सुशिक्षित व जागरूक असल्यामुळे ही प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. निंबाळकर यांनी केंद्र सरकारवर टीका करत नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव तपासण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबरोबरच प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
शहरी भागात या प्रक्रियेचा वेग काहीसा कमी असला तरी पुढील आठ दिवसांत सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि पदाधिकारी हे काम पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खानापूर, बेळगाव ग्रामीण, कित्तूर, बैलहोंगळ, सौंदत्ती, गोकाक आणि आरभावी मतदारसंघांमध्ये बीएलओ आणि संबंधित अधिकारी चांगले काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. निंबाळकर यांनी नागरिकांना ८ ऑगस्टपर्यंत मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. ज्या नागरिकांची नावे यादीत नसतील त्यांनी घाबरून न जाता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.





