belgaum

पंढरपूर गाठता आलं नाही; पण ‘विठ्ठलनामात’च संपला जीवनप्रवास

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन घरातून निघालेल्या एका वारकरी महिलेचा प्रवास मात्र पंढरपूरपर्यंत पोहोचू शकला नाही. पांडुरंगाच्या भेटीची आस उराशी बाळगून दिंडीत सहभागी झालेल्या सौ. शालन प्रकाश सायनेकर (वय 59) यांचे दिंडीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने येळळूर गावासह वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी (ता. 13) वैष्णव सदन आश्रम, येळळूर येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत त्या प्रथमच सहभागी झाल्या होत्या. विठ्ठलाच्या नामस्मरणात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिभावाने त्या चार दिवस दिंडीसोबत चालत होत्या. सहप्रवाशांच्या मते, गुरुवारी दिवसभरही त्या आनंदात आणि उत्साहात होत्या.

मात्र गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 1.30 वाजता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. दिंडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना चिक्कोडी येथील के.एल.ई. रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविता आले नाही.

 belgaum

शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव येळळूर येथील निवासस्थानी आणण्यात आले. ही बातमी समजताच गावात शोककळा पसरली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली भक्त अखेर पंढरपूर गाठू शकली नाही, याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे.

वारकरी संप्रदायात अशीही भावना व्यक्त केली जात आहे की, विठ्ठलाचे नाम घेत, दिंडीत चालत असताना आलेला मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे दुःखासोबतच त्यांच्या पुण्याईचीही चर्चा वारकऱ्यांमध्ये होत आहे.

सौ. शालन सायनेकर यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, दिर, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर यांच्या वहिनी होत.

त्यांच्यावर आज, शुक्रवार (ता. 17) रोजी सकाळी 11 वाजता फुटुक तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.