बेळगाव लाईव्ह : हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात हिडकल जलाशयाच्या पेयजल योजनेची मुख्य जलवाहिनी बेकायदेशीरपणे फोडून पाण्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात हेब्बाळ येथील ग्रामस्थांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची आणि न्यायाची मागणी केली आहे.
हेब्बाळ येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार, गावातील रहिवासी परप्पा मल्लप्पा चौगला आणि केम्पण्णा सिद्धप्पा चौगला यांनी पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी बेकायदेशीरपणे फोडली. या जलवाहिनीतून सुमारे २०० फूट लांब पाइपलाइन टाकून हे पाणी थेट स्वतःच्या विहिरीत सोडले आणि गेल्या २० वर्षांपासून या पाण्याचा वापर स्वतःच्या शेतीसाठी करून पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ स्थानिक ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, हे प्रकरण घाईघाईने दाबून टाकण्याच्या उद्देशाने ज्या ठिकाणी जलवाहिनी फोडण्यात आली होती, तो व्हॉल्व्ह असलेला कट्टाच पूर्णपणे नष्ट करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दबाव आणल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हेब्बाळ ग्रामपंचायतीकडून संबंधित संशयितांविरोधात संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप संशयितांवर कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केलेली नाही, याबद्दल गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, गावात वारंवार निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईबाबत गावकऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, विभागाकडून हेब्बाळ गावाला गेल्या २० वर्षांपासून दररोज सुमारे ४ लाख लीटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जात असल्याची माहिती समोर आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवूनही गावात पाणी का पोहोचत नव्हते, याचे मुख्य कारण या जलवाहिनीच्या तोडफोडीमुळे आणि अनधिकृत वापरामुळे स्पष्ट झाले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या पाणी चोरीमुळे परिसरातील शेतीचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या बेकायदेशीर कृत्यामुळे सुमारे १४ हजार एकर क्षेत्रातील ऊस आणि द्राक्ष पिकांना वेळेवर पाणी मिळाले नसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ वैयक्तिक लक्ष घालून बेकायदेशीर पाणी वापर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगविषयक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.





