belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत कोण कोणत्या मुद्द्यावर चर्चा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत ऐतिहासिक किल्ल्यासमोरील नव्याने उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांचा मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला. या जागेवर फ्लॉवर मार्केट आणि ऑटोमोबाईल ॲक्सेसरीजची दुकाने सुरू करण्याच्या प्रस्तावाला खासदार जगदीश शेट्टर यांनी तीव्र आक्षेप घेत, हा परिसर व्यावसायिक वापरासाठी नव्हे तर क्रीडा आणि सार्वजनिक सुविधांसाठी राखून ठेवण्याची मागणी केली.

शेट्टर यांनी ऐतिहासिक किल्ल्याच्या परिसरात गॅरेज, टायर किंवा पंक्चरची दुकाने सुरू झाल्यास परिसराचे विद्रूपीकरण होईल, कचऱ्याची समस्या वाढेल आणि वारसा स्थळाचे सौंदर्य धोक्यात येईल, असे मत व्यक्त केले. त्याऐवजी पीपीपी तत्त्वावर आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि मुलांसाठी भव्य खेळाचे मैदान उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

यावर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने आणि कंत्राटदाराने गुंतवणूक केल्याने निर्णय मागे घेतल्यास न्यायालयीन वाद निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले. अखेरीस मुख्य रस्त्यालगतच्या जागेऐवजी मागील पडीक जागेचा महसूलवाढीसाठी वापर करण्याचा पर्याय पुढे आला. या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.

 belgaum

बैठकीत कॅन्टोन्मेंटमधील विकासकामे रखडण्यामागील कारणांचाही आढावा घेण्यात आला. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे कंत्राटदार निविदांकडे पाठ फिरवत असल्याची माहिती सीईओ सुदाम मंचलवार यांनी दिली. त्यावर सध्याच्या बाजारभावानुसार नवीन अंदाजपत्रके तयार करून फेरनिविदा काढण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय छावणीतील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली. शाळांमध्ये बहुउद्देशीय हॉल आणि स्वयंपाकघर उभारण्यालाही हिरवा कंदील मिळाला. हॉकी मैदानाचा विकास, फुटबॉल संस्थांशी भागीदारी तसेच धोबीघाट परिसरातील बंद बोअरवेल तातडीने कार्यान्वित करण्याचेही निर्णय बैठकीत घेण्यात आले.

ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासदार जगदीश शेट्टर, ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, सीईओ सुदाम मंचलवार, सुधीर तुपेकर यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.