बेळगाव लाईव्ह:हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाची स्थगिती असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत शेतकऱ्यांवर दबाव टाकून रस्त्याचे काम हाती घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. तथापि शेतकऱ्यांना जागरूक राहावे लागणार आहे.
गेल्या कांही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बायपासचे काम सुरू करण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही गेल्या कांही दिवसांपासून शिवारात आरेखन करण्यात येऊन फलक लावण्यात येत आहेत.
झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासचे काम सुरू करता येत नाही. बेळगावचा ‘झिरो पॉईंट’ निश्चितीसाठी दिवाणी न्यायालयात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयीन लढा सुरू असतानाच बायपासच्या ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे
गेल्या शनिवारी यरमाळ शिवारात रस्त्याचे काम करण्याचा झालेला प्रयत्न शेतकऱ्यांनी विरोध करून हाणून पाडला. तथापि आतापर्यंत शेतकरी एकजुटीने बायपासच्या विरोधात लढत होते. मात्र गेल्या महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आपण बायपाससाठी जमीन जमीन देण्यास तयार आहोत असे पत्र उच्च न्यायालयात देऊन याचिकेतून आपले नावे कमी करून घेतली आहेत.
त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांवर मोठी जबाबदारी आली आहे. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांना न्यायालयाबरोबरच शिवारातही सतर्क रहावे लागणार आहे. पावसाळा सुरू होण्याआधी बायपासच्या कामाला सुरुवात करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात होणारी सुनावणी महत्त्वाची ठरणार असून त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.