बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील न्यू वैभव नगरला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रासाला समावे जावे लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
न्यू वैभव नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर वारंवार कचरा साठत असून कचरा संकलनाची गाडी नियमित येत नसल्याचे समोर आले आहे.
त्यातच महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्याशेजारील गटारांमधील गाळ काढून तो वाहनात भरून नेण्याऐवजी रस्त्यावरच टाकून दिला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून पादचारी आणि वाहनधारकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत.
कचऱ्याच्या ढिगांमुळे या भागात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. महानगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.




