बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या नियमांनुसार मंजुरी मिळाल्यानंतरच देशात वाहनांची विक्री केली जाते. ग्राहक वाहन खरेदी करताना लाखो रुपये खर्च करून जीएसटी आणि रोड टॅक्स स्वरूपात मोठा कर भरतात. मात्र, त्यानंतरही ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जात नसल्याचे समोर आले आहे.
अनेक वाहन उत्पादक कंपन्या आजही काही विशिष्ट वाहनांसाठी E10 किंवा त्यापेक्षा कमी इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनाची शिफारस करतात. परंतु, बाजारात पर्याय उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना सक्तीने E20 पेट्रोल वापरावे लागत आहे.
या मिश्रणामुळे वाहनाची कार्यक्षमता, मायलेज आणि इंजिनच्या दीर्घकालीन देखभालीवर विपरीत परिणाम होण्याची भीती वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.
भारतीय वाहन उद्योगाला करांच्या माध्यमातून मोठा आर्थिक हातभार लावणारे ग्राहक हक्कांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिले आहेत. कोणतेही इंधन धोरण राबवताना ग्राहकांचे हित आणि वाहन उत्पादकांच्या तांत्रिक शिफारशी यांचा विचार केला जाणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी बेळगाव जिल्ह्यात XP100, Power100 आणि Speed100 हे इथेनॉलमुक्त प्रीमियम इंधन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
देशातील प्रत्येक वाहनधारकाला आपल्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचा कायदेशीर अधिकार मिळायला हवा, असे राजकुमार टोपण्णावर यांनी म्हटले.





