बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारकडून बेळगाव शहराचा विकास करण्यासाठी आणि भुयारी गटार योजना सक्षम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, बेळगावमधील चव्हाट गल्ली येथे या शासकीय निधीचा आणि करदात्यांच्या पैशाचा सरळ-सरळ ‘चुराडा’ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ड्रेनेज चेंबर आणि पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि घाईगडबडीत उरकले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि चव्हाट गल्लीयेथील रहिवासी सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराने ड्रेनेज चेंबर बांधताना खाली कोणतेही काँक्रीटीकरण केले नाही. चेंबरला आतून व बाहेरून गिलावा न करताच, घाईगडबडीत त्यावर माती टाकून हे निकृष्ट काम लपवण्याचा निर्लज्ज प्रयत्न कंत्राटदाराकडून करण्यात आला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी तात्काळ यु.जी.डी. अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून हा गैरप्रकार दाखवून दिला. अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना दिल्यानंतर, जेसीबीच्या साहाय्याने टाकलेली माती पुन्हा बाहेर काढण्यात आली आणि गिलावा करण्याचे काम सुरू करण्यात आले.
सुधारणा करण्याच्या नावाखाली कंत्राटदार अजूनही नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. चेंबरला गिलावा करण्यासाठी चांगल्या दर्जाची वाळू वापरण्याऐवजी, खडीचा भुसा मिक्स करून प्लास्टर केले जात आहे, ज्याला अजिबात मजबुती नाही. तसेच, याठिकाणी वापरण्यात येत असलेले ड्रेनेज पाईप्स देखील अत्यंत साध्या व हलक्या दर्जाचे आहेत. यामुळे भविष्यात संपूर्ण ड्रेनेज लाईन चोक-अप होऊन नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाकडून बेळगावला नवीन आणि चांगल्या दर्जाची युजीडी लाईन मिळावी म्हणून फंड आला आहे. पण अधिकारी आणि कंत्राटदार मिळून जुने चेंबर बरे आहेत असे सांगत काम टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. चव्हाट गल्लीत तर नियमांची सर्रास पायमल्ली सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या भ्रष्ट कंत्राटदारावर कडक कारवाई करावी आणि दर्जेदार काम करून घ्यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी दिला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर बेळगाव महानगरपालिका प्रशासन आणि युजीडीचे वरिष्ठ अधिकारी संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करतात आणि चव्हाट गल्लीतील नागरिकांना न्याय मिळवून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





