belgaum

चन्नेवाडी बुथसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडेही मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र मतदान केंद्र (बूथ) आणि स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याची मागणी करत महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते तथा चन्नेवाडीचे रहिवासी धनंजय पाटील यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यापूर्वी दोन दिवसांपूर्वी चन्नेवाडी ग्रामस्थांनी खानापूर तहसीलदारांना याच मागण्यांसाठी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची प्रत तसेच ग्रामस्थांच्या सह्याही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्या.

धनंजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकांसाठी चन्नेवाडी व भुत्तेवाडी येथील मतदारांसाठी चन्नेवाडी येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते. मात्र, नंतर भुत्तेवाडीतील मतदारसंख्या अधिक असल्याच्या कारणावरून हे मतदान केंद्र भुत्तेवाडी येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

 belgaum

भुत्तेवाडी येथील मतदान केंद्राला आमचा कोणताही विरोध नसला, तरी चन्नेवाडीतील मतदारांना तेथे मतदानासाठी जाणे गैरसोयीचे ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि शारीरिक अडचणी असलेल्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत असल्याने चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय, कसबा नंदगड ग्रामपंचायतीअंतर्गत भुत्तेवाडी आणि चन्नेवाडी या दोन्ही गावांसाठी एकच वॉर्ड असून त्यामध्ये तीन ग्रामपंचायत सदस्य आहेत. भुत्तेवाडीची मतदारसंख्या चन्नेवाडीपेक्षा दुपटीने अधिक असल्यामुळे चन्नेवाडीला ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व मिळणे कठीण होत आहे. परिणामी गावाच्या विकासकामांवरही परिणाम होत असल्याने चन्नेवाडीसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुढील महिन्यात चन्नेवाडीसाठी स्वतंत्र मतदान केंद्राच्या मागणीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्वतंत्र वॉर्डाच्या मागणीसंदर्भात मतदारसंख्या व इतर आवश्यक बाबींचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे संपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.