belgaum

सप्टेंबर अखेरीस उड्डाण पुलाचे काम सुरू : जिल्हाधिकारी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल (फ्लायओव्हर) प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, टेंडर प्रक्रिया, वाहतूक नियोजन, युटिलिटी शिफ्टिंग आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लायओव्हरच्या पहिल्या टप्प्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मार्फत २७० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून, त्याची मुदत ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल. सप्टेंबरअखेरीस अथवा आगामी दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फ्लायओव्हरच्या बांधकामादरम्यान हेस्कॉमच्या वीजवाहिन्या, पाणीपुरवठा पाइपलाइन आणि सांडपाणी वाहिन्यांच्या (सीवेज लाईन) स्थलांतरासाठी (युटिलिटी शिफ्टिंग) आवश्यक खर्चाचाही टेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 belgaum

प्रकल्पाच्या कक्षेत येणारी झाडे सरसकट तोडली जाणार नसून, शक्य तितकी झाडे पुनर्रोपण (ट्रान्सलोकेशन) करून वाचविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी बॉक्साईट रोड रुंदीकरणावेळी सुमारे ३५ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर या प्रकल्पातील झाडेही १ ते २ किलोमीटर परिसरातील सरकारी अथवा सार्वजनिक जागांवर स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

बांधकामादरम्यान वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि पीडब्ल्यूडी यांच्या समन्वयाने वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तात्पुरते रस्ते, बॅरिकेडिंग आणि वाहतूक व्यवस्थेसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, पहिल्या टप्प्यानंतर याच वर्षी दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचे टेंडर काढले जाणार आहे. या टप्प्याचे डिझाइन अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत ते राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केले जाईल.

प्रकल्पामुळे नागरिक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला कोणताही अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी लवकरच सर्व संबंधित घटकांची व्यापक समन्वय बैठक (Broad Consultation Meeting) आयोजित करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

या बैठकीस पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महानगरपालिका, हेस्कॉम, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.