बेळगाव लाईव्ह : मराठी साहित्यात रस असलेल्या साहित्यप्रेमी, नवोदित कवी-कवयित्री तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार काव्यलेखनाचे तंत्र शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावात विशेष ‘काव्य लेखन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंडित नेहरू महाविद्यालय, बेळगाव येथे पार पडणार आहे.
विश्व भारत सेवा समिती (बेळगाव), राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), मंथन मराठी साहित्य संघ, विश्वभारत जनकल्याण सामाजिक संस्था, बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील यलगार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत बेळगावातील ज्येष्ठ कवी शिवाजी शिंदे आणि प्रख्यात कवी गुणवंत पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कविता कशी सुचते, तिची जडणघडण कशी करावी, यमक, छंद, मुक्तछंद यांचे तंत्र, तसेच प्रभावी काव्य सादरीकरणाची शैली याबाबत ते सहभागींस मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला देवकुमार बिर्जे आणि विलास घाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच कविता लेखनाची आवड असलेल्या प्रत्येक मराठी भाषिकासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी केले आहे.
थोडक्यात कार्यक्रम
- कार्यक्रम : काव्य लेखन कार्यशाळा
- दिनांक : शनिवार, १८ जुलै २०२६
- वेळ : सकाळी ११:०० वाजता
- स्थळ : पंडित नेहरू महाविद्यालय, बेळगाव
- प्रवेश : सर्व साहित्यप्रेमी, विद्यार्थी व नवोदित कवी-कवयित्रींसाठी खुला.





