belgaum

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावात निदर्शने

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथे उपोषणास बसलेले ख्यातनाम पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी बेळगाव येथील छत्रपती संभाजी चौकात विविध संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

लडाखच्या प्रश्नांवर आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या १७ दिवसांपासून सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. ५९ वर्षांचे असूनही ते केवळ पाणी आणि मीठ घेऊन उपोषण करत आहेत. या आंदोलनाची केंद्र सरकारने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याबद्दल निदर्शनादरम्यान वक्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. एका जागतिक कीर्तीच्या पर्यावरणतज्ज्ञाच्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे लोकशाहीला मारक आहे, असे मत आंदोलकांनी मांडले.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर बोलताना वक्त्यांनी परीक्षा पद्धतीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक अत्यंत कठीण परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या नैराश्यातून विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूंना सध्याची परीक्षा व्यवस्थाच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

 belgaum

देशातील महत्त्वाच्या परीक्षा सुरक्षितपणे घेण्यास अपयशी ठरल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी आंदोलनात करण्यात आली. परीक्षा पद्धती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी कडक कायदेशीर सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी लावून धरण्यात आली.

जीवन विवेक प्रतिष्ठान, प्रगतीशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव आणि इतर संलग्न संस्थांच्या वतीने छत्रपती संभाजी चौकात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या निदर्शनांमध्ये प्रा. आनंद मेणसे, नीला आपटे, ॲड. नितीन बोळबंदी, कॉम. नागेश सातेरी, डॉ. शिवाजी कागणीकर आणि ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.