बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) या अत्याधुनिक प्रणालीद्वारे गेल्या दीड महिन्यातील वाहतूक नियम उल्लंघनाचा सविस्तर आणि धक्कादायक आकडेवारी असलेला विश्लेषणात्मक अहवाल पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे.
बेळगाव जिल्हा पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या ४ जून ते १५ जुलै २०२६ या कालावधीतील इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) अहवालातून वाहतूक शिस्तीबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. अवघ्या ४२ दिवसांत १३.२७ लाख वाहनांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी २.३३ लाख वाहतूक नियमभंग नोंदवले गेले. म्हणजेच दररोज सरासरी ५,५६९ नियमभंग कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले.
आकडे काय सांगतात?
- तपासण्यात आलेली वाहने : 13,27,723
- नोंदवलेले नियमभंग : 2,33,892
- म्हणजेच तपासलेल्या प्रत्येक 100 वाहनांमागे सुमारे 18 वाहनांनी कोणता ना कोणता नियम मोडला.
हेल्मेटकडे सर्वाधिक दुर्लक्ष
एकूण नियमभंगांपैकी 1,75,601 प्रकरणे (75.1%) ही विना हेल्मेट दुचाकी चालवण्याची आहेत. म्हणजे नोंदवलेल्या प्रत्येक चार नियमभंगांपैकी तीन हेल्मेटशी संबंधित आहेत. यावरून बेळगाव जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत अद्याप मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचे स्पष्ट होते.

सीटबेल्टही मोठी समस्या
46,011 चालक सीटबेल्टशिवाय वाहन चालवताना आढळले. याशिवाय 8,323 अल्पवयीन चालक आणि 3,301 ट्रिपल सीट प्रवास करणारे दुचाकीस्वारही कॅमेऱ्यात कैद झाले.
दंडाची रक्कम मोठी, वसुली अत्यल्प
नियमभंगासाठी पोलिसांनी 5.01 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, त्यापैकी केवळ 1.89 लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. म्हणजेच 99 टक्क्यांहून अधिक दंड अद्याप थकीत असून वसुली हेच पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
प्रत्येक मिनिटाला…
४२ दिवसांच्या आकडेवारीनुसार,
- दर तासाला सुमारे 232 नियमभंग
- प्रत्येक मिनिटाला जवळपास 4 नियमभंग ITMS कॅमेऱ्यांमध्ये नोंदवले गेले.
या आकडेवारीवरून बेळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक ITMS प्रणालीमुळे नियमभंग सहजपणे समोर येत असले, तरी वाहतूक शिस्त आणि दंड वसुली या दोन्ही बाबतीत अजूनही मोठे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.





