belgaum

बेळगावच्या क्रीडापटूंचे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक यश

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: कंग्राळी खुर्द येथील जिल्हा क्रीडांगण, नेहरूनगर येथे सराव करणाऱ्या बेळगाव व परिसरातील क्रीडापटूंनी बंगळुरू येथे झालेल्या कर्नाटक राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत बेळगावचा लौकिक वाढवला आहे. या खेळाडूंनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली.

कर्नाटक स्टेडियम, बंगळुरू येथे झालेल्या कर्नाटक राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये कलोलाप्पा बांदवडकर याने २० वर्षांखालील भालाफेक प्रकारात ६४.८४ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले.

भाव्या सी. जे. हिने १८ वर्षांखालील भालाफेक प्रकारात ४७.६६ मीटर अंतराची कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. विशांत राठोड याने १६ वर्षांखालील गटातील भालाफेक प्रकारात ५४.४० मीटर अंतराची उच्चांकी कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.

 belgaum

काविश नाईक याने १८ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळवले. स्नेहा शंकर हिने अडथळा शर्यतीत रौप्यपदक, तर लांब उडीत कांस्यपदक पटकावले. अभिषेक बेनाडे याने गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे या सर्व खेळाडूंची पुडुचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

याशिवाय स्वरा पावशे, करण पाटील आणि माधुरी पाटील यांनी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.

या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. राज्यस्तरावरही त्यांनी चमकदार कामगिरी करत बेळगावच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.

या खेळाडूंना ॲथलेटिक्स प्रशिक्षक संजीवकुमार नाईक, अधीक्षक राजू कोलकार, मधुकर देसाई तसेच युथ स्पोर्ट्सच्या संचालकांचे मार्गदर्शन लाभत आहे. बी.के. कंग्राळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिल पावशे यांनी स्वतः बंगळुरू येथे उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

राज्यस्तरीय स्पर्धेतील या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत असून, राष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू बेळगावचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.