बेळगाव लाईव्ह : गुन्हेगारांसाठी सिम्हस्वप्न आणि जनतेसाठी मैत्रीपूर्ण पोलिस प्रशासनावर भर देणारे माळमारुती पोलिस ठाण्याचे सीपीआय बी.आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या राष्ट्रपती प्रशंसनीय सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या उल्लेखनीय पोलिस सेवेमुळे शहर पोलिस विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पोलिस विभागात प्रदीर्घ सेवा बजावताना गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था तसेच सायबर गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कारवाईसाठी गड्डेकर यांची निवड करण्यात आली आहे.
गड्डेकर यांनी २००५ मध्ये पीएसआय म्हणून पोलिस विभागात प्रवेश केला. महालिंगपूर, इळकल आणि माळमारुती पोलिस ठाण्यांत त्यांनी सेवा बजावली. २०१६ मध्ये सीपीआय पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीबी विशेष पोलिस ठाणे, माळमारुती पोलिस ठाणे आणि सीईएन गुन्हे पोलिस ठाण्यात काम केले. सध्या ते माळमारुती पोलिस ठाण्याचे सीपीआय म्हणून कार्यरत आहेत.
खून, दरोडा, घरफोडी, साखळी चोरी, अमली पदार्थांची तस्करी, सायबर फसवणूक तसेच ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

साखळी चोरीच्या मालिकेत सक्रिय असलेल्या इराणी टोळीविरोधात कारवाई करताना २८ गुन्हे उघडकीस आणून १,०४९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सीसीबीमध्ये कार्यरत असताना त्यांनी ५९ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून १,५१६ ग्रॅम सोने आणि ३,३०८ ग्रॅम चांदी जप्त केली होती.
हिंडलगा कारागृहात असलेल्या एका कुख्यात गुंडाची सुटका करण्यासाठी आलेल्या टोळीचा कटही त्यांनी उधळून लावला. या कारवाईत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
सायबर गुन्ह्यांविरोधातील त्यांच्या कामाचीही विशेष दखल घेण्यात आली आहे. २०२० ते २०२२ या कालावधीत नोंद झालेल्या १३३ सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणांत आरोपींची बँक खाती गोठवून सुमारे ४.९५ कोटी रुपये पीडितांना परत मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२४ मधील एका ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात गुजरातमधून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात १.११ कोटी रुपये गोठवण्यात आले असून, त्यापैकी ३० लाख रुपये पीडिताला परत मिळवून देण्यात आले.
२०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरवर करण्यात आलेल्या कारवाईतही गड्डेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ३३ जणांना अटक करण्यात आली.
अमली पदार्थविरोधी कारवाईतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून ५० किलो ४५२ ग्रॅम गांजा जप्त करून नऊ आरोपींना अटक करण्यात आली. विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासात आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास पूर्ण करण्याची कामगिरीही त्यांच्या सेवेत महत्त्वाची ठरली आहे.
गड्डेकर यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी यापूर्वी डीजी आणि आयजीपी, एडीजीपी तसेच पोलिस आयुक्तांकडून अनेक वेळा रोख बक्षिसे आणि प्रशंसापत्रे देऊन गौरव करण्यात आला आहे. आता राष्ट्रपती प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झाल्याने त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय पोलिस सेवेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.





