बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय पटलावर उपस्थित झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन सादर केले.
शिवसेना (उबाठा) मुंढवा गाव शाखेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आदित्य ठाकरे आले असताना ही भेट झाली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावसह सीमाभागातील सध्याची परिस्थिती, मराठी भाषिकांचे प्रश्न आणि कर्नाटक सरकारकडून होत असल्याचा आरोप असलेल्या दडपशाहीचा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच बेळगावमध्ये मराठी पाट्या, मराठी शाळा आणि मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप समितीने केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय मराठी भाषिकांवर कन्नड भाषा लादण्याचे प्रयत्न, महाराष्ट्रातील मराठी नेते व कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी आणि मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक अस्मितेसमोरील आव्हाने यांसारखे मुद्देही आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वतः सेल्फी घेत निवेदन स्वीकारले. सीमाभागातील मराठी बांधवांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक विचार करण्याचे तसेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या भेटीप्रसंगी शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख चंदन साळुंखे, गणपती पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, सातेरी, पाटील, मारुती पाटील, गंगाराम वीर, अर्जुन वीर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेले हे निवेदन महत्त्वाचे मानले जात आहे.




