बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत बेळगाव विभागातील मराठी तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांसाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिक्षक भरती अधिसूचनेत तातडीने आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागामार्फत राज्यभरात सुमारे १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बेळगाव माध्यमिक विभागासाठी यापूर्वी ८३१ शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत एकूण २४० पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी कन्नड माध्यमातील GPT पदवीधर प्राथमिक शिक्षकांची ६५ पदे, इंग्रजी माध्यमातील ४ पदे, गणित व विज्ञान विषयासाठी कन्नड माध्यमातील ७४ पदे, जीवशास्त्रासाठी ३३ पदे, समाजशास्त्रासाठी ५३ पदे आणि इयत्ता पहिली ते आठवीसाठी संगणक विज्ञान शिक्षकांची ११ पदे जाहीर करण्यात आली आहेत.
मात्र, या अधिसूचनेत मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा स्पष्ट समावेश नसल्याने मराठी भाषिक समाजात नाराजी व्यक्त होत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. मराठीसह इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठीही आवश्यक शिक्षक पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नसल्याने स्थानिक भाषिक गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बेळगाव, खानापूर आणि निपाणीतील शाळांचा प्रश्न
बेळगाव विभाग हा बहुभाषिक प्रदेश असून बेळगावच्या ग्रामीण भागासह खानापूर आणि निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोकसंख्या आहे. या भागातील अनेक शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या, विषयांची आवश्यकता आणि स्थानिक भाषिक परिस्थिती लक्षात घेऊन मराठी माध्यमासाठी पुरेशी शिक्षक पदे उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि मराठीप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नांमुळे शैक्षणिक वातावरण चांगले असून अनेक शाळांची पटसंख्याही समाधानकारक आहे. मात्र, आवश्यक शिक्षकांची भरती न झाल्यास भविष्यात या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण होऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि पटसंख्येवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
पात्र मराठी उमेदवारांनाही संधी देण्याची मागणी
मराठी माध्यमातून D.Ed., B.Ed. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले अनेक उमेदवार शिक्षक भरतीची संधी अपेक्षित आहेत. मराठी माध्यमासाठी पदे उपलब्ध न झाल्यास या पात्र उमेदवारांच्या रोजगाराच्या संधींवरही परिणाम होणार असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
एका बाजूला मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असून दुसऱ्या बाजूला पात्र उमेदवार उपलब्ध असताना, माध्यमनिहाय शिक्षक पदांचा स्पष्ट समावेश न होणे ही चिंतेची बाब असल्याचे समितीने म्हटले आहे.
आठ प्रमुख मागण्या
समितीने बेळगाव विभागासाठी जाहीर करण्यात आलेल्या ८३१ शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेचा तातडीने पुनर्विचार करून आवश्यक दुरुस्ती करावी, १२ ऑगस्टच्या अधिसूचनेत मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा आणि मराठी तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठी विद्यार्थीसंख्या व शैक्षणिक गरजेनुसार स्वतंत्र पदे मंजूर करावीत, अशी मागणी केली.

तसेच D.Ed., B.Ed. पात्र मराठी उमेदवारांना समान संधी द्यावी, बेळगाव ग्रामीण, खानापूर व निपाणीतील मराठी माध्यमाच्या शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या व विषयांची गरज लक्षात घेऊन माध्यमनिहाय पदसंख्या स्पष्टपणे जाहीर करावी आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे कोणत्याही भाषिक माध्यमातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
मराठी माध्यमाच्या शाळांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास त्यांच्या गुणवत्ता व पटसंख्येवर परिणाम होऊन भविष्यात शाळा बंद होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही समितीने दिला. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन भरती अधिसूचनेत आवश्यक दुरुस्ती करावी; अन्यथा मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सागर कणबरकर, गजानन शहापूरकर, सागर बिळगोजी, सुरज जाधव, निलेश काकतकर, परिणय कदम, नारायण सांगावकर, सतीश देसुरकर, अरुण शिंदे यांच्यासह खानापूरहून रमेश धबाले, सोमनिंग धबाले तसेच निपाणीहून सागर जाधव, सागर माने, दत्तात्रय धामगावकर, अमृत खेमनाळकर, के. बी. खामकर, आनंद धामणेकर आदी उपस्थित होते.





