belgaum

गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप: परंपरा, विकृती आणि विधायकतेचा ध्यास

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : ‘१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती’ असलेला श्रीगणेश हा बुद्धी आणि मांगल्याचा स्रोत मानला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यामागे समाज संघटित व्हावा आणि लोकांमध्ये राष्ट्रीय चेतना जागृत व्हावी हा उदात्त उद्देश होता. परंतु, आज हा मूळ उद्देश बाजूला फेकला गेला असून सार्वजनिक मंडळांमध्ये इर्षा आणि स्पर्धेच्या भावनेतून हा उत्सव साजरा केला जात आहे.

आज भाद्रपद चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंतच्या या उत्सवात धार्मिक रीतीरिवाजांना फाटा दिला जात आहे. ‘पुढचे पाच आणि मागचे दोन’ या उक्तीप्रमाणे अकरा-बारा दिवसांचे गणपती तब्बल १५ ते २० दिवसांपर्यंत मंडपात राहू लागले आहेत. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर बेळगावसारख्या शहरातही आगमन, मुहूर्तमेढ, पाद्यपूजन यांसारख्या सोहळ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र, महानगर आणि बेळगावसारख्या शहरांतील फरक मंडळांनी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.

उत्सवाला आलेले हे स्वरूप अत्यंत अपायकारक ठरत आहे. ढोल-ताशा, डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, क्रॅकर्सचा अतिवापर आणि मूर्तीची वाढती उंची यांवरून चढाओढ सुरू आहे. आगमनापासून सुरू झालेली स्पर्धा विसर्जन मिरवणुकीत ‘तुझा बाप्पा की माझा बाप्पा शेवटी विसर्जित होणार?’ या अहंकारापर्यंत पोहोचते. या लांबलेल्या मिरवणुकांचा आणि कचऱ्याचा मोठा फटका मिरवणूक मार्गावरील व्यापाऱ्यांना बसतो.

 belgaum

प्रशासनाकडून दरवर्षी उंची, पीओपी मूर्तींवर बंदी आणि शाडूच्या मूर्तींबाबत पूर्वसूचना दिल्या जातात. मात्र, मूर्तिकारांसह मंडळे याकडे सोयीस्कर पाठ फिरवतात. परिणामी विसर्जनानंतर तलावांची अवस्था भयानक असते. ज्या गणेशाची अकरा दिवस आराधना केली जाते, त्या भग्न मूर्ती चोहोबाजूंनी विखुरलेल्या दिसतात आणि निर्माल्य कचऱ्यासारखे साचते. हे चित्र अत्यंत विदारक आणि श्रद्धाळूंचे मन दुखवणारे असते.

या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये उभी राहिलेली ‘प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची चळवळ’ अत्यंत आशेचा किरण ठरत आहे. काही मंडळे आजही याला अपवाद असून ती पारंपारिक पद्धतीने, मर्यादित उंचीची मूर्ती ठेवून सामाजिक व विधायक उपक्रम राबवतात. काळाच्या ओघात बदल होणे आवश्यक असले, तरी ते समाजासाठी उपयुक्त व सकारात्मक असायला हवेत. गणेशोत्सवाचे हे बदलते स्वरूप बदलून हा उत्सव पुन्हा एकदा मूळ आणि विधायक स्वरूपातच साजरा व्हावा, अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.