बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना पोलीस प्रशासनाने दिलेले मार्ग, नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ऐनवेळी मिरवणुकीचे मार्ग बदलणे किंवा वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेश मंडळांनी पोलिसांशी समन्वय साधून नियोजन करावे, असे आवाहन बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले.
बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात गणेशोत्सवाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त निकम बोलत होते. बैठकीला पोलीस उपायुक्त एन. व्ही. बर्मनी, पोलीस निरीक्षक जे. एन. काळीमिरची यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेश महामंडळाच्या वतीने रणजीत चव्हाण पाटील, विजय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.
निकम म्हणाले, “आम्हाला तुमच्या आनंदात कोणतेही विरजण पाडायचे नाही. तुम्ही सणाचा आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी काही नियम आणि नियोजन आवश्यक आहे.”
गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या ठिकाणी कोणता बंदोबस्त असणार, याचे नियोजन माहिती आणि गुप्तचर यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीनुसार केले जाते. त्यामुळे ऐनवेळी मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचा आग्रह धरल्यास पोलीस आणि मंडळांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. “तुम्हीही आनंदी राहणार नाही आणि आम्हीही,” असे निकम यांनी स्पष्ट केले.

३६ तास चालणाऱ्या मिरवणुकीवर चिंता
बेळगावमधील गणेश विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त तब्बल ३६ तासांपर्यंत चालल्याचा उल्लेख करत निकम यांनी मिरवणुकीच्या कालावधीबाबतही चिंता व्यक्त केली. पूर्वी ‘पहिला कोण, दुसरा कोण’ अशी स्पर्धा असायची; आता ‘शेवटी कोणाचे विसर्जन होणार’ अशी स्पर्धा सुरू झाली आहे, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या आवाजातील डीजेबाबत गांभीर्य
डीजेच्या वाढत्या आवाजाबाबतही पोलीस आयुक्तांनी मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या. पूर्वी एक-दोन स्पीकर असायचे; आता स्पीकरची संख्या वाढून त्याची अक्षरशः मोठी भिंत उभी केली जाते. इतक्या मोठ्या आवाजात अर्धा तास उभे राहून पाहा, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे लक्षात येईल, असे ते म्हणाले.
“डीजे वापरू नका, असे आम्ही म्हणत नाही; मात्र त्याचा वापर तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी योग्य पद्धतीने झाला पाहिजे,” असे निकम यांनी सांगितले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आगमन सोहळा रात्री १० पूर्वी पूर्ण करा
गणेशमूर्ती आगमन सोहळ्याबाबतही पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची सूचना केली. मुंबईत गणेश आगमन सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
गणेशमूर्ती आगमन सोहळा रात्री १० वाजण्यापूर्वी पूर्ण करावा आणि आगमनावेळी डीजेचा वापर करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. विसर्जनाच्या दिवशी डीजे संदर्भातील नियमांबाबत पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्रपणे निर्णय आणि सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
प्लाझ्मा, लेझरला परवानगी नाही
गणेशोत्सवातील नव्या ट्रेंडच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा आणि लेझर शोबाबतही निकम यांनी स्पष्ट भूमिका मांडली. लेझरचा प्रकाश थेट डोळ्यांवर गेल्यास दृष्टीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्लाझ्मा आणि लेझरला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावची शांतता तीन राज्यांसाठी महत्त्वाची
बेळगाव हे तीन राज्यांच्या सीमांना जोडणारे महत्त्वाचे शहर असल्याने येथील कोणत्याही घटनेचा परिणाम व्यापक पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पडणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निकम यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पुढील १५ ते २० दिवसांत पोलिसांसाठी रात्रंदिवस कामाचा काळ असणार आहे. विविध माध्यमांतून माहिती घेत त्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिका किंवा इतर प्रशासकीय विभागांशी संबंधित मंडळांच्या मागण्यांबाबत आपण स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही निकम यांनी दिले.
“आपण सर्वांनी एक टीम म्हणून काम करूया आणि यंदाच्या गणेशोत्सवाला एक चांगले नाव मिळवून देऊया. सण हा सणासारखाच साजरा करूया आणि समाजाला चांगला संदेश देऊया,” असे आवाहन करत पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी गणेश मंडळांना सहकार्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही विविध सूचना व समस्या मांडल्या. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम करून उत्सव शांततेत पार पाडण्यावर बैठकीत भर देण्यात आला.





