बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश आगमन सोहळ्यात आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी किंवा मोठ्या आवाजातील ध्वनिव्यवस्थेचा वापर करता येणार नाही. तसेच मिरवणूक रात्री १० वाजण्यापूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी केले.
गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आयोजित एसीपी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव हा नागरिकांच्या उत्साहाचा सण असून, मिरवणुकीतील जल्लोष आणि उत्साह कमी करण्याचा पोलिस प्रशासनाचा कोणताही उद्देश नाही. मात्र, उत्सव साजरा करताना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळांनी पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे बरमनी यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करावे लागते. बेळगावमध्ये उपलब्ध असलेल्या पोलिस मनुष्यबळाव्यतिरिक्त मोठ्या संख्येने पोलीस बाहेरून बंदोबस्तासाठी बोलवावे लागतात. जवळपास ४ ते ५ हजार पोलीस सुमारे ३५ दिवस बंदोबस्तासाठी कार्यरत असतात. या पोलिसांच्या वाहतुकीपासून निवास आणि भोजनापर्यंतची व्यवस्था करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असते.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताची तयारी पोलिसांकडून साधारण एक महिना आधीच सुरू केली जाते. यापूर्वी विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. दरोडा, रॉडारिझम, गुंडगिरी, अमली पदार्थ आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाते.
दरवर्षी साधारण ८ ते १० जणांवर हद्दपारीची कारवाई केली जाते. मात्र, यंदा आतापर्यंत २३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, त्यांना किमान सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती बरमनी यांनी दिली.

गणेशोत्सवानंतरही पोलिसांची जबाबदारी संपत नाही. वर्षभर विविध सण, मिरवणुका, व्हीआयपी दौरे तसेच गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांना बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेश मिरवणूक आगमन सोहळे वेळेत पूर्ण करणे, डीजे-डॉल्बीचा वापर न करणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही मंडळांची जबाबदारी आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी केले.





