बेळगाव लाईव्ह : चोरला घाट रस्त्यावर डेल्टा रिसॉर्टजवळ डंपर आणि डॅटसन कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, प्राथमिक माहितीनुसार युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कारमध्ये आणखी प्रवासी अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जांबोटीच्या दिशेने गोव्याकडे जाणारा डंपर आणि गोव्याहून बेळगावकडे येणारी डॅटसन कार यांच्यात ही धडक झाली. धडकेनंतर डंपरने कारला फरफटत नेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या भीषण धडकेत कार रस्त्यावरच पूर्णपणे चेपली असून, तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी खानापूर येथून वाहन कापण्याचे कटर मागविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, वडगाव येथील संबंधितांचे नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
या अपघातामुळे चोरला घाट परिसरात खळबळ उडाली आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अपघातातील मृतांची संख्या, जखमींची स्थिती आणि घटनेबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





