बेळगाव लाईव्ह: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून दोघांवर दगड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बेळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान खडक गल्ली गणेश मंडळ आणि टेंगिनकेरी गणेश मंडळातील तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादातून पुढे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी आदित्य राजू अळवाणी (वय २२, रा. खडक गल्ली, बेळगाव) यांनी २८ सप्टेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आदित्य अळवाणी आणि ओंकार महेंद्र शिंदे यांना अडवून आरोपींनी दगड व लाकडी दांडक्यांनी त्यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या तक्रारीवरून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
विशेष पथकाची कारवाई; चौघे अटकेत
सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष डी. सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्केट पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांच्या सहभागाने विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २८ सप्टेंबर रोजी चार आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
- राजू शेडगे (२५) – रा. टेंगिनकेरी गल्ली, बेळगाव.
- विशाल तुकाराम तहसीलदार (४१) – रा. टेंगिनकेरी गल्ली, बेळगाव.
- सतीश नंदू घसारी (४६) – रा. टेंगिनकेरी गल्ली, बेळगाव.
- विनित विनायक बडमंजी (१८) – रा. माळी गल्ली, बेळगाव.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे.
या कारवाईबद्दल बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तांनी मार्केट पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.





