बेळगाव लाईव्ह : चोर्ला घाटात डंपर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत वडगाव येथील ४२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री डेल्टा रिसॉर्टजवळ हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, डॅटसन कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमध्ये अडकलेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला वाहनाचा काही भाग कापावा लागला.
मृत युवकाचे नाव शाम उर्फ रवळनाथ तुळजाई (रा. आनंदनगर, वडगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाम तुळजाई हे गोव्याहून बेळगावच्या दिशेने कारने येत होते. यावेळी चोर्ला घाट रस्त्यावरील डेल्टा रिसॉर्टजवळ जांबोटीच्या दिशेने गोव्याकडे जाणाऱ्या डंपरची आणि त्यांच्या डॅटसन कारची जोरदार धडक झाली. या धडकेत कारचा पूर्णपणे चुराडा झाला.
अपघातानंतर शाम हे कारमध्ये अडकले. त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले. कारची अवस्था अत्यंत खराब झाल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर खानापूर येथून वाहन कापण्याचा कटर मागवण्यात आला. कारचा काही भाग कापल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह खानापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
या अपघातप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अपघाताची नेमकी कारणे आणि परिस्थिती याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.





