belgaum

४२ तासांची मिरवणूक!वेळमर्यादा निश्चित करा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या गणेशोत्सवाची भव्यता आणि परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र, गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा वाढता वेळ, वाहतूक कोंडी आणि ध्वनी प्रदूषण यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा विसर्जन मिरवणूक तब्बल ४२ तास चालल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विसर्जनासाठी निश्चित वेळमर्यादा लागू करण्याची मागणी केली आहे.

बेळगावमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आकर्षक सजावट, भव्य देखावे आणि उत्साहपूर्ण मिरवणुका हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावांसह दूरवरूनही नागरिक येतात. मात्र, अलीकडच्या काळात विसर्जन मिरवणुकीचा कालावधी वाढत चालल्याने उत्सवाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

२४ तासांवरून मिरवणूक ४२ तासांपर्यंत

 belgaum

पूर्वी बेळगावमधील गणेश विसर्जन मिरवणूक २४ तासांच्या आत पूर्ण होत असे. कालांतराने हा कालावधी २८, ३२ आणि ३६ तासांपर्यंत वाढला. यंदा तर मिरवणूक तब्बल ४२ तास चालल्याचे सुजित मुळगुंद यांनी नमूद केले. मिरवणुकीचा हा वाढता कालावधी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा नागरिकांना फटका

मिरवणुकीदरम्यान सतत सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांच्या आवाजामुळे आणि प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, दम्याचे रुग्ण, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पशुपक्ष्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याकडे मुळगुंद यांनी लक्ष वेधले.

कपिलेश्वर पुलासह महत्त्वाच्या मार्गांवर ३६ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. वाहतूक कोंडीमुळे परिसरातील दुकानदारांचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विसर्जन पूर्ण होईपर्यंत पोलीस, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ कर्तव्यावर राहावे लागते. अशा वेळी त्यांच्या जेवणाची, विश्रांतीची आणि इतर मूलभूत सुविधांचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘शेवटची मूर्ती’ नेण्याच्या स्पर्धेला आळा घाला

गणेश मंडळांमध्ये शिस्त, सामाजिक कार्य आणि आकर्षक देखाव्यांची सकारात्मक स्पर्धा असावी. मात्र, मिरवणुकीत शेवटची मूर्ती नेण्याच्या स्पर्धेमुळे विसर्जनाला विलंब होत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे मुळगुंद यांनी म्हटले आहे.

पंचकाचे कारण देत विसर्जन बाराव्या दिवसापर्यंत पुढे ढकलण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो. तसेच, विसर्जनातील विलंबामुळे देखावे सादर करण्यासाठी मेहनत घेणारे कलाकार, लहान मुले आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांना सलग ४२ तास मिरवणूक पाहण्यासाठी थांबणे शक्य नसल्याने सार्वजनिक सहभागावरही परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले.

विसर्जनासाठी २४ ते ३० तासांची मर्यादा निश्चित करा

गणेश विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी ठोस नियम तयार करावेत. मिरवणूक २४ तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून, आवश्यकतेनुसार कमाल ३० तासांची वेळमर्यादा निश्चित करावी आणि तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी सुजित मुळगुंद यांनी केली आहे.

वेळमर्यादा निश्चित करूनही तिचे पालन झाले नाही, तर भविष्यात मिरवणुकीचा कालावधी ५० ते ६० तासांपर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

गणेश मंडळांतील ज्येष्ठ पदाधिकारी आणि अनुभवी कार्यकर्त्यांनी तरुणांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. उत्सवाचा आनंद साजरा करताना सार्वजनिक वाहतूक, रुग्णालयांतील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणींचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवाची परंपरा, उत्साह आणि भव्यता कायम राखतानाच नागरिकांची गैरसोय टाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे गणेश मंडळे, पोलीस आणि प्रशासन यांनी समन्वय साधून विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करावे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.