belgaum

४२ तासांची विसर्जन मिरवणूक; परंपरा की नियोजनाचा अभाव?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल ४२ तास चालल्याच्या पार्श्वभूमीवर, ही परंपरा की नियोजनाचा प्रश्न, असा सवाल महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते प्रविण बाळकृष्ण रेडेकर यांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सवाची परंपरा आणि मिरवणुकीचा उत्साह कायम ठेवतानाच विसर्जनाचे योग्य नियोजन करून मिरवणूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचा उत्साह, भक्ती आणि जल्लोष पाहायला मिळतो. मिरवणुकीची भव्यता ही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असली, तरी ती तब्बल ४२ तास चालणे योग्य आहे का, याचा विचार नागरिक आणि प्रशासनाने करण्याची वेळ आली आहे, असे रेडेकर यांनी नमूद केले.

विसर्जन मिरवणुकीच्या प्रदीर्घ कालावधीमुळे पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांवर मोठा ताण येतो. तसेच वाहतूक व्यवस्था, रुग्णवाहिकांची हालचाल, आपत्कालीन सेवा आणि शहरातील दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 belgaum

परंपरा कायम ठेवून नियोजनावर भर द्या

गणपती बाप्पावरील श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवून विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी पुढील वर्षापासून ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. मिरवणुकीचे वेळापत्रक, मंडळांचा सहभाग, वाहतूक व्यवस्थापन आणि विसर्जन प्रक्रियेचा कालावधी याबाबत संबंधित यंत्रणांनी समन्वयाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रेडेकर यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाची परंपरा जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वेळेचे भान, शिस्त आणि नागरिकांची गैरसोय टाळणेही आवश्यक आहे. भक्ती आणि उत्साहाला योग्य नियोजनाची जोड मिळाल्यास विसर्जन मिरवणूक अधिक सुरळीत पार पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढील वर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि सुरळीत होवो, अशी अपेक्षा व्यक्त करत रेडेकर यांनी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

— प्रविण बाळकृष्ण रेडेकर कार्यकर्ता, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.