बेळगाव लाईव्ह : अपघातात तरुण मुलाचा मृत्यू झाल्याचे दुःख पचवत बोंगाळे कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. निखिल नितीन बोंगाळे (वय ३४) याच्या अवयवदानामुळे पाच गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दुःखाच्या प्रसंगातही घेतलेल्या या निर्णयातून बोंगाळे कुटुंबीयांनी माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
मूळचे बेळगावमधील शाहापूर येथील नार्वेकर गल्लीतील रहिवासी असलेले निखिल बोंगाळे सध्या निपाणीतील लेटेक्स कॉलनी येथे वास्तव्यास होते.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात निखिल गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.

निखिलच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या कठीण प्रसंगातही कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या लाडक्या मुलाचे अवयव इतर गरजू रुग्णांच्या उपयोगी पडावेत आणि त्यांना नवजीवनाची संधी मिळावी, या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे पाच रुग्णांना मदत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरही तिच्या अवयवांमुळे इतरांचे जीवन वाचू शकते, याची जाणीव करून देणारा हा निर्णय आहे. निखिलच्या रूपाने एका कुटुंबाने आपला प्रिय व्यक्ती गमावला असला, तरी त्याच्या अवयवदानामुळे इतर कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
निखिल बोंगाळे यांचे अवयवदान केवळ पाच रुग्णांसाठी नवजीवनाची आशा ठरले नाही, तर समाजात अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणारा माणुसकीचा संदेशही देऊन गेले. दुःखाच्या क्षणीही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बोंगाळे कुटुंबीयांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





