belgaum

वंदे मातरम गीतावरून बेळगाव महापालिका सभेत वादावादी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम गीतावरून बुधवारी वादावादी झाली. वंदे मातरम गीत पूर्ण होण्यापूर्वीच भाजप सदस्य खाली बसल्याचा आरोप नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनी केला. यावर भाजप सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान वंदे मातरम गीताच्या गायनावरून हा वाद निर्माण झाला. गीताची सर्व सहा कडवी पूर्ण होण्यापूर्वीच भाजप सदस्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत खाली बसल्याचा आरोप सोंटक्की यांनी केला. वंदे मातरम गीताला आमचा कोणताही विरोध नाही. आम्हीही राष्ट्रप्रेमी आहोत. मात्र, गीत पूर्ण होण्यापूर्वीच सदस्यांनी खाली बसणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सोंटक्की यांच्या आरोपावर भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रप्रेमी असल्याचे सांगणाऱ्यांना वंदे मातरम गीताबाबत आक्षेप का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले.

 belgaum

यावेळी महापौर प्रीती कामकर यांनी सरकारच्या आदेशानुसार वंदे मातरम गीताची दोन कडवी गायली जात असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण गीत गायले गेले, तरी त्यातून गीताचा अपमान होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, सोंटक्की यांनी आपली भूमिका स्पष्ट करत वंदे मातरम गीताला आपला कोणताही विरोध नसल्याचे सांगितले. गीताची सहाही कडवी पूर्ण होण्यापूर्वीच भाजप सदस्य खाली बसल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला.

वंदे मातरम गीताच्या गायनावरून सुरू झालेल्या या वादामुळे बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.