belgaum

बेळगाव महापालिकेत महिला अधिकाऱ्याचा नगरसेवकाशी खडाजंगी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांवरून झालेल्या चर्चेचे पडसाद सभा संपल्यानंतरही उमटले. महापालिकेच्या विकास विभागाच्या उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर आणि एमआयएमचे नगरसेवक शाहिद खान पठाण यांच्यात कार्यालयातच जोरदार शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे महापालिका कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शाहिद खान पठाण यांनी आपल्याला लक्ष्य करून टीका केल्याचा आरोप उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी केला. विकासकामांच्या संदर्भात चर्चा करताना, काम करण्यास आपण सक्षम नसल्याच्या अर्थाने नगरसेवकांनी टिप्पणी केल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला.

सभा संपल्यानंतर निपाणीकर यांनी नगरसेवक पठाण यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. “मी नोकरी सोडायला तयार आहे; मात्र त्यांना सोडणार नाही. माझ्याविरोधात बोलणारे ते कोण?” अशा शब्दांत निपाणीकर यांनी संताप व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.

 belgaum

सभागृहात महिला अधिकाऱ्याचा अपमान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “तुम्ही सभागृहात एका महिला अधिकाऱ्याचा अपमान करत आहात,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, दोघांमधील वाद मिटवण्यासाठी काही भाजप नगरसेवकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याबद्दलही निपाणीकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पैशांच्या संदर्भातही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे महापालिका कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सर्वसाधारण सभेत विकासकामांवरून सुरू झालेल्या चर्चेचे रूपांतर सभा संपल्यानंतर अधिकारी आणि नगरसेवक यांच्यातील वादात झाल्याने या घटनेची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.