बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील हणमंत बाळेकुंद्री यांच्या शेतात कंत्राटदाराकडून सुरू असलेले बायपास रस्त्याचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येत बंद पाडले. न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असताना आणि कामाची कोणतीही अधिकृत वर्क ऑर्डर नसताना कंत्राटदाराने हे काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रकल्पाचा ‘झिरो पॉईंट’ सिद्ध झाल्याशिवाय दावेदार शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करू नये किंवा पिकांची नासाडी करू नये असे स्पष्ट निर्देश आहेत. याप्रकरणी न्यायालयात दावा अद्याप प्रलंबित आहे.
तसेच विशेष भू-संपादन अधिकारी यांच्याकडून माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेल्या पत्रात बायपासच्या कामाची वर्क ऑर्डर दिलेली नाही असे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व कायदेशीर पुराव्यांच्या आधारे शेतकऱ्यांनी काम थांबवण्याची मागणी करत कंत्राटदाराला धारेवर धरले.

वाद वाढल्यानंतर कंत्राटदाराने मध्यस्थीसाठी स्थानिक पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. मात्र, शेतकऱ्यांनी न्यायालयाचा आदेश आणि माहिती अधिकाराची कागदपत्रे सादर केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनीही निरुत्तर होत कंत्राटदाराला सूचना दिली.
रितसर कागदपत्रे व वर्क ऑर्डर दाखवल्याशिवाय दाव्यातील जमिनीवर कोणतेही काम करू नये, असे निर्देश पोलिसांनी दिल्यानंतर कंत्राटदाराने आपल्या सर्व मशीनरी आणि यंत्रसामग्री तिथून हलवली. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा एकदा रखडले आहे.





