belgaum

‘त्या’ घटनेनंतर संबंधित ऑपरेटर अधिकाऱ्याला निलंबितचे आदेश

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत ‘वंदे मातरम’ गीतावरून झालेल्या खडाजंगीनंतर महापौरांनी संबंधित ऑपरेटर आणि अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीत ‘वंदे मातरम’ गीतावरून तीव्र खडाजंगी आणि गदारोळ झाला. बैठकीच्या सुरुवातीला ध्वनिक्षेपकावर गीताची केवळ दोनच कडवी वाजल्याने भाजप नगरसेवकांनी उभे राहून संपूर्ण गाणे पूर्ण केले.

यावर नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनी आक्षेप घेतला. राज्य शासनाने वंदे मातरम केवळ दोन कडव्यांपुरते मर्यादित ठेवले असून सर्वांनी या आदेशाचे पालन करावे, असे ते म्हणाले. या मागणीला भाजप नगरसेवकांनी तीव्र विरोध करत काँग्रेस पक्षाने पूर्वी संपूर्ण गाणे स्वीकारले होते, मग आता विरोध कशासाठी, असा सवाल उपस्थित केला.

 belgaum

गदारोळ वाढल्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी ध्वनिक्षेपक व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तात्काळ साऊंड ऑपरेटर आणि संबंधित अधिकाऱ्याला सभागृहासमोर उभे करून थेट जाब विचारला. मायक्रोफोन बंद-चालू करण्याबाबत किंवा ध्वनी कमी करण्याबाबत तुमच्यावर कोणाचा दबाव होता का, असा थेट प्रश्न महापौरांनी त्यांना विचारला. त्या घटनेनंतर संबंधित ऑपरेटर आणि अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश महापौर प्रीती कामकर यांनी कौन्सिल सचिवांना दिले.

शासकीय आणि पालिका बैठकांमधील अशा निष्काळजीपणाची त्यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली. या कारवाईमुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सभागृहातील ध्वनिक्षेपक व्यवस्था आणि शासकीय नियमांच्या पालनावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मनपा बैठकीत ध्वनिक्षेपक यंत्रणेचा बोजवारा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण कौन्सिल बैठकीत ध्वनिक्षेपक आणि वातानुकूलित यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याने जोरदार गदारोळ पाहायला मिळाला.

महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत सुरुवातीपासूनच ध्वनिक्षेपक वारंवार बंद पडत होते. त्यामुळे आपापले मुद्दे मांडण्यात नगरसेवकांना मोठा अडथळा निर्माण झाला. अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही यंत्रणा पूर्ववत न झाल्याने, विरोधी नगरसेवकांनी बाहेरून स्वतःची ध्वनिक्षेपक यंत्रणा आणून सभागृहात बसवली आणि कामकाज पुढे चालू ठेवले.

विरोधी नगरसेवकांच्या या कृतीमुळे सत्ताधारी भाजपनेही महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. भाजप नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरग्याळ यांनी सभागृहातील दुरवस्था आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनावर कडक ताशेरे ओढले. तर बैठकीचे कामकाज सुरळीत चालावे आणि सर्वांचा आवाज ऐकू जावा म्हणूनच ही पर्यायी व्यवस्था केल्याचे विरोधी नगरसेवक मुझम्मिल ढोणी यांनी स्पष्ट केले.

मनपाच्या बैठकीत घडलेल्या या प्रकारामुळे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या सभागृहाचीच अशी अवस्था असल्याने लोकप्रतिनिधींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.