बेळगाव लाईव्ह : महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आलेल्या बैठकीत निरीक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली .उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर महापौरांसह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.
बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होताच, सभेसाठी बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांची निरीक्षक म्हणून निवड केल्याचा विषय समोर आला आणि मोठा गदारोळ निर्माण झाला.
सत्ताधारी गटाचे सदस्य राजशेखर ढोणी यांनी यावर आवाज उठवत, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारे निरीक्षक नियुक्त करण्याची कायद्यात कोणती तरतूद आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला. याला उपमहापौर हनुमंत कोंगाळी आणि इतर सत्ताधारी सदस्यांनी पाठिंबा देत, महापौर व सदस्यांना विचारात न घेता तसेच १०-१५ दिवस आधी नोटीस न देता अचानक निरीक्षक नियुक्त करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत तीव्र आक्षेप नोंदवला.
सदस्यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले की, नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या ई-मेल मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. कालच आलेल्या आदेशाबाबत महापौरांना कल्पना देण्यात आली होती, असे आयुक्तांनी स्पष्ट केले तरीही सभागृहातील गोंधळ सुरूच राहिला. दरम्यान मध्यस्थी करत महापौर प्रीती कामकर यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका सभेसाठी निरीक्षक नियुक्त करणे पूर्णपणे बेकायदेशीर असून, आजवर आपण सरकारच्या सर्व आदेशांचे पालन करत आलो असल्याचे स्पष्ट केले.

महापौरांनी या कारवाईला बेकायदेशीर ठरवल्यामुळे नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनी आक्षेप घेतला आणि “सरकारशी थेट संघर्षात उतरू नका,” असा इशारा दिला. मात्र, याच्या उलट भूमिका घेत विरोधी सदस्यांनी, “सरकारच्या अधिकृत पत्रानुसार ही कारवाई झाली असताना ती बेकायदेशीर कशी ठरू शकते?” असा सवाल केला.
यामुळे सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये तुफान शाब्दिक चकमक उडाली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत निरीक्षकांच्या नियुक्तीभोवतीच फिरत राहिलेली ही सभा बेळगावच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चेचा विषय ठरली आहे.





