belgaum

दूध आणि बस भाडेवाढीवरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल!

0
DR sonali sarnobat
 belgaum

बेळगाव लाईव्ह: राज्यात दुष्काळ आणि महागाईमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटाचा सामना करत असताना दूध दरवाढ आणि बस प्रवास भाडेवाढ करून काँग्रेस सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी तीव्र टीका भाजप महिला मोर्चा कर्नाटकच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात दुष्काळाच्या संकटाची भर पडली असताना सरकारने दूध आणि बस प्रवासाच्या दरात वाढ करून जनतेवर आणखी आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे कारण पुढे करून दूध दरवाढ करणाऱ्या सरकारने वाढीव दरातील किती रक्कम प्रत्यक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे, याचा खुलासा करावा. तसेच उर्वरित रकमेचा विनियोग नेमका कशासाठी केला जाणार आहे, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी डॉ. सरनोबत यांनी केली.

 belgaum

शक्ती योजनेवरूनही सरकारला घेरले

महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेस सरकारने आता बस प्रवासाचे भाडे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एका बाजूला गॅरंटी योजनांचा गाजावाजा करायचा आणि दुसऱ्या बाजूला भाडेवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावायची, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

महिला सक्षमीकरणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित करत डॉ. सोनाली सरनोबत यांनी काँग्रेस सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या दाव्यांवरही टीका केली. महिला, गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा करणाऱ्या सरकारला त्यांच्या प्रत्यक्ष समस्यांची जाणीव नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे महागाई आणि त्यात दूध व बस भाडेवाढीचा अतिरिक्त भार, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दरवाढीच्या निर्णयांचा फेरविचार करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.