बेळगाव लाईव्ह : ऊस दरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ अन्वये ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी ४ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला.
ऊसाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी राज्यभरात शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांनी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राज्यातील शेतकऱ्यांना जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी बेळगावात दाखल होऊन हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाली होती.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा निर्णय घेतला आहे.
चन्नम्मा चौकातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता
जेल भरो आंदोलनासाठी हिंडलगा कारागृहाकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने चन्नम्मा चौकात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. चन्नम्मा चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा वाहतूक केंद्रबिंदू आहे.
या चौकातून शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, मध्यवर्ती बसस्थानक, न्यायालये, शासकीय कार्यालये तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची कार्यालये आणि निवासस्थानांकडे जाणारे मार्ग जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्णदेवराय चौक, संगोळी रायण्णा चौक आणि अशोक चौक हेही महत्त्वाचे वाहतूक मार्ग आहेत.
आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाल्यास सार्वजनिक वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. याशिवाय हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात संवेदनशील प्रकरणांतील न्यायाधीन कैदी तसेच शिक्षा भोगणारे कैदी असल्याने कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या भागांत लागू राहणार जमावबंदी
पोलीस आयुक्तालयाच्या खडेबाजार उपविभागातील खडेबाजार, कॅम्प, टिळकवाडी आणि उद्यमबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा आदेश लागू राहील.
तसेच मार्केट उपविभागातील मार्केट, माळमारुती, शहापूर आणि एपीएमसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीसह बेळगाव ग्रामीण उपविभागातील बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जमावबंदी काळात सात प्रमुख निर्बंध
१. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.
२. शस्त्रे, काठ्या, भाले, तलवारी, गदा, बंदुका, चाकू, लाठ्या किंवा शरीराला इजा पोहोचवू शकणाऱ्या घातक वस्तू बाळगणे आणि घेऊन फिरण्यास बंदी असेल.
३. दगड, स्फोटक पदार्थ, ज्वलनशील वस्तू आणि इतर धोकादायक साहित्य आणणे किंवा साठवणे निषिद्ध असेल.
४. दगड किंवा इतर वस्तू फेकण्यासाठी अथवा उडवण्यासाठी वापरली जाणारी साधने सोबत बाळगण्यास मनाई असेल.
५. प्रतिबंधित शस्त्रे, स्फोटक किंवा विनाशकारी वस्तू आढळल्यास पोलिसांना त्या जप्त करण्याचा अधिकार असेल. संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
६. सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजवणे, भाषणे करणे, हावभाव किंवा नक्कल सादर करणे तसेच सार्वजनिक सभ्यता आणि नैतिकतेला बाधा पोहोचवणाऱ्या कृतींना मनाई असेल.
७. ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास बंदी असेल.
अंत्ययात्रा आणि परवानगीच्या मिरवणुकांना सूट
अंत्ययात्रा तसेच सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये कारवाई करण्याचे अधिकार संबंधित पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता, वाहतूक व्यवस्था आणि हिंडलगा कारागृहाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत बेळगाव शहर आणि संबंधित ग्रामीण हद्दीत पोलिसांचा कडक बंदोबस्त राहण्याची शक्यता आहे.




