belgaum

यांनी घेतली संदीप देशपांडे यांची भेट

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष तथा भालकी तालुकाध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी जनतेची भूमिका आणि गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सीमावासीयांच्या भावना मांडल्या.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा यांनी यापूर्वी बेळगावात मराठी जनतेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गौडा यांची घेतलेली भेट सीमाभागातील मराठी कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. या पार्श्वभूमीवर मुधाळे यांनी देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील परिस्थिती आणि मराठी जनतेच्या भावना स्पष्ट केल्या.

त्यानंतर शुभम शेळके यांच्याशीही देशपांडे यांचा फोनवरून संवाद घडवून आणण्यात आला. शेळके यांनी सीमाप्रश्नाचा इतिहास, मराठी जनतेचा प्रदीर्घ संघर्ष तसेच कन्नड सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.

 belgaum

यावर देशपांडे यांनी गौडा यांच्याशी झालेली भेट बेळगाव किंवा सीमाप्रश्नाच्या संदर्भात नसून देशभरातील हिंदी सक्तीविरोधात व्यापक लढा उभारण्याच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, देशपांडे यांनी News18 ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली जात असेल तर बेळगावात कन्नडची सक्ती केली तर गैर काय, अशा आशयाची भूमिका मांडल्याने सीमावासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सीमाभागातील मराठी जनतेसाठी हा केवळ भाषेचा प्रश्न नसून इतिहास, अस्मिता आणि महाराष्ट्रात सामील होण्याच्या प्रदीर्घ लढ्याचा विषय असल्याचे मुधाळे व शेळके यांनी स्पष्ट केले.

सीमाप्रश्नाचा सखोल इतिहास आणि सीमावासीयांच्या भावना समजून घेऊन भूमिका मांडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “सीमाप्रश्न समजून घ्या, सीमावासीयांच्या भावना समजून घ्या; हा संघर्ष अद्याप संपलेला नाही,” असा संदेशही यावेळी देण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.