बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने बेळगाव महापालिका प्रशासनाने उत्सवाच्या तयारीला वेग दिला आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महापौर प्रीती कामकर, मनपा आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह अधिकारी आणि नगरसेवकांनी गुरुवारी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
महापौर, आयुक्त आणि मनपा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली. त्यानंतर राणी चन्नम्मा चौक, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गणपती गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, संभाजी चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, मार्केट परिसर यासह गणेशमूर्तींच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांची पाहणी करण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान मोठ्या गणेशमूर्ती, वाहने आणि भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता, वीजवाहिन्या, झाडांच्या फांद्या आणि इतर संभाव्य अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, मनपा आणि हेस्कॉमच्या पथकाकडून मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू करण्यात आली आहे. खडे बाजार, शहापूर आणि हेमू कलानी चौक परिसरात रस्त्यावर आलेल्या फांद्या हटविण्याचे काम करण्यात आले. मिरवणुकीपूर्वी आवश्यक त्या ठिकाणी ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी महापौर प्रीती कामकर यांनी सांगितले की, रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता आणि वीजवाहिन्यांसह आवश्यक कामांसाठी एल अँड टी, हेस्कॉमसह संबंधित सर्व विभागांना २४ तास काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कामाला गती देण्यात आली आहे.

मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारी बैठकीतील निर्णयानुसार सर्व विभागांना आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
यापूर्वी गणेश महामंडळांच्या प्रतिनिधींनीही मिरवणूक मार्गांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करत संभाव्य अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, राजू भातकांडे, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, आनंद चौहान, रेश्मा कामकर, वैशाली भातकांडे यांच्यासह नगरसेवक, विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी सुळगेकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गणेश मंडळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले असून, मिरवणुका सुरळीत पार पडण्यासाठी मार्गांची पाहणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी, रस्ते दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत.





