बेळगाव लाईव्ह : यावर्षी पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची भीषण छाया पसरली आहे. प्रत्येक भागात शेती-पिकांसोबतच आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून ऐन हिवाळ्याच्या तोंडावरच बेळगाव शहरावर तीव्र पाणीटंचाईचे गडद ढग जमा होऊ लागले आहेत. शहराला पाण्याचा मुख्य पुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयांमधील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली असून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बेळगावकरांचा घसा कोरडा पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
राकसकोप जलाशयाची पाण्याची पातळी २९ ऑक्टोबरअखेर २,४७२.६० फुटांवर खाली आली असून गेल्या वर्षी याच दिवशी ती २,४७५.८० फूट इतकी होती. म्हणजेच अवघ्या वर्षभरात जलपातळी तब्बल ३.२० फुटांनी खालावली असून ०.५ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सध्या पाण्याचा नवीन येवा पूर्णपणे बंद झाला आहे.
दुसरीकडे शहराचा दुसरा प्रमुख आधार असलेल्या हिडकल (राजा लखमगौडा) धरणाची परिस्थितीही बिकट होत चालली आहे. ५१ टीएमसी क्षमता असलेल्या या जलाशयात सध्या ५०.६०५ टीएमसी साठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या ५०.८७० टीएमसी साठ्याच्या तुलनेत तब्बल ०.२६५ टीएमसी पाणी कमी झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दुष्काळामुळे हिडकल धरणातही पाण्याची आवक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सुमारे सात लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बेळगाव शहराला दररोज तब्बल १३० ते १३५ दशलक्ष लीटर (MLD) पाण्याची नितांत गरज असते. यंदा पावसाने ऐन मोसमात दांडी मारल्यामुळे मान्सून संपताच दोन्ही धरणांमधील पाण्याचा ओघ पूर्ण थांबला आहे. त्यातच अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाल्यामुळे उपलब्ध तुटपुंज्या साठ्यावर ऐन उन्हाळा कसा काढायचा, असा गंभीर प्रश्न महापालिका व जलमंडळासमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे कडक नियोजन आणि संभाव्य पाणी कपातीची तयारी केली नाही, तर येणारा उन्हाळा बेळगावकरांसाठी अत्यंत खडतर ठरणार आहे.
यंदा अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाल्यामुळे उपलब्ध तुटपुंज्या साठ्यावर ऐन उन्हाळा कसा काढायचा, असा गंभीर प्रश्न उभा राहिला असून नागरिकांनी देखील आतापासूनच काटकसरीने आणि जपून पाण्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.




