बेळगाव लाईव्ह : उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम येथून प्रवासासाठी निघालेले हेलिकॉप्टर जोशीमठजवळील चई गाव परिसरात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कर्नाटकातील पाच जणांचा समावेश असून, बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अरटाळ गावचे रहिवासी असलेले पोलीस अधिकारी अरुण साळुंखे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अरटाळ गावासह संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले होते. मात्र, काही अंतरावर जाताच जोशीमठजवळील चई गाव परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये बंगळूर येथील पोलीस अधिकारी अरुण साळुंखे यांच्यासह के. सुधीर, शंकरेगौडा, एस. एस. नटराज आणि प्रताप यांचा समावेश आहे. मृतांमध्ये बंगळूरमधील काही वकिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
अरुण साळुंखे हे 2007 च्या बॅचचे कर्नाटक पोलीस अधिकारी होते. ते बंगळूर येथील गुन्हे शाखेत (सीसीबी) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी ते इतर सहकाऱ्यांसह उत्तराखंड येथे प्रवासासाठी गेले होते. मात्र, हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
अरुण साळुंखे यांच्या निधनाची बातमी समजताच अथणी तालुक्यातील अरटाळ गावावर शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयांनी बंगळूरकडे प्रयाण केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
या दुर्घटनेमुळे कर्नाटक पोलीस दलातही हळहळ व्यक्त होत असून, एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या निधनाने पोलीस खात्याची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




