बेळगाव लाईव्ह : भाषावार प्रांतरचनेच्या वेळी सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर झालेला अन्याय आणि केंद्र सरकारविरोधातील धगधगता असंतोष पुन्हा एकदा पेटून उठला आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली, परंतु दुर्दैवाने बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी आणि भालकी यांसारखा बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटकात (पूर्वीच्या म्हैसूर राज्यात) डांबण्यात आला. या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध गेली तब्बल ७० वर्षे सीमा भागातील मराठी जनता केंद्र सरकारकडे सातत्याने न्याय मागत आहे.
आपला हक्क आणि महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा दर्शवण्यासाठी सीमेवरील मराठी बांधवांनी आजवर सत्याग्रह, साराबंदी, हरताळ, बंद, भव्य मेळावे, निदर्शने आणि आक्रोश मोर्चे अशा अनेक लोकशाही मार्गांनी आपला तीव्र विरोध नोंदवला आहे.
अनेक वेळा आश्वासने देऊनही केंद्र सरकारने हा न्याय्य प्रश्न प्रलंबितच ठेवल्यामुळे सीमावासीय मराठी जनतेच्या मनातील संताप कायम आहे. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून कायदेशीर लढाई सुरू ठेवलीच आहे, परंतु न्यायालयातल्या या लढ्यासोबतच रस्त्यावरील लढा जिवंत ठेवणे तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहे.
रस्त्यावरील या ऐतिहासिक संघर्षाचा एक मुख्य भाग म्हणून १ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एका भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सीमा भागातील मराठी जनतेची एकजूट आणि निष्ठा पुन्हा एकदा केंद्र सरकारला ठामपणे दाखवून देण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संभाजी उद्यान, बेळगाव येथे सीमाभागातील सर्व मराठी नागरिक, तरुण, महिला आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने हजर राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.




