belgaum

पुन्हा महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांकडून १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय शामराव देवणे यांच्यासह त्यांच्या समवेत येणाऱ्या सुमारे २५ महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांना १ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ३० ऑक्टोबर रोजी आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश केवळ १ नोव्हेंबर २०२६ या दिवसासाठी लागू राहणार आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी विजय देवणे आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते निपाणी-कोगनोळी मार्गे बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करून काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

 belgaum

त्यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर भाषणे किंवा वक्तव्ये होऊन कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

कोणाला प्रवेशबंदी?

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.

  1. विजय शामराव देवणे – अध्यक्ष, शिवसेना (उद्धव गट), कोल्हापूर जिल्हा.
  2. संजय पवार – उपाध्यक्ष, शिवसेना.
  3. सुनील मोदी – कोल्हापूर शहरप्रमुख.
  4. सुनील शिंत्रे – शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख.
  5. विशाल देवकुळे – कोल्हापूर शहरप्रमुख.
  6. मंजीत माने – कोल्हापूर जिल्हा शहरप्रमुख.
  7. वरील पदाधिकाऱ्यांसोबत येणारे इतर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेचे कार्यकर्ते.

पोलीस यंत्रणेला अंमलबजावणीचे निर्देश

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी सीमाभागातील मराठी भाषिकांकडून महाराष्ट्रात जाण्याच्या मागणीसाठी काळा दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांच्या बेळगाव प्रवेशावर बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय पुन्हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.