१ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर समितीतर्फे शिवस्मारकासमोर लाक्षणिक उपोषण
बेळगाव लाईव्ह : गेल्या सत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याला यशस्वी पूर्णविराम मिळण्याची वेळ जवळ आली आहे. सीमाप्रश्न सुटणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे युवा पिढीने या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवून महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटन अधिक मजबूत करावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
१ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त रविवारी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येथील श्री राजा छत्रपती शिवस्मारक सभागृहासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपोषणाची दुपारी ३ वाजता सभेत सांगता झाली. यावेळी झालेल्या सभेत दिगंबर पाटील यांनी सीमालढ्याची भूमिका स्पष्ट करताना समितीने आजवर आपल्या मूळ तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नसल्याचे सांगितले.
भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी भाषिक बहुल प्रदेश तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून सीमाभागातील मराठी जनता आपल्या न्याय्य मागणीसाठी संघर्ष करीत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असून, सीमाप्रश्न सुटेपर्यंत तो थांबणार नाही. गेल्या काही वर्षांत अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आणून भाषिक वाद चिघळविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषिकांनी एकजुटीने आणि समितीच्या मूळ तत्त्वांवर ठाम राहून लढा पुढे नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गोपाळ देसाई यांनी सीमालढ्याची पार्श्वभूमी, समितीची भूमिका आणि सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. आगामी काळात युवकांची संघटना मजबूत करून तालुक्यात समितीचे संघटन आणि मराठी भाषिकांचे अस्तित्व अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सभेचे स्वागत व प्रास्ताविक समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषिक या मागणीसाठी एकत्रितपणे संघर्ष करीत आहेत. आता युवा पिढीही समितीकडे आकर्षित होत असून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याची जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आहे. नव्या पिढीला सीमालढ्याचा इतिहास आणि त्यामागील भूमिका समजावून सांगून हा लढा पुढे नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी सीमाप्रश्नाचा लढा पुढे नेण्यासाठी संघटनात्मक ताकद वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. राजकीय पक्षांचे विचार आणि मतभेद बाजूला ठेवून समितीचे ध्येय व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी युवकांना एकत्र आणून त्यांच्यात सीमाप्रश्नाविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विलास बेळगावकर यांनी समितीची स्थापना ज्या मूळ तत्त्वांवर झाली, त्याच तत्त्वांच्या बळावर आजही सीमालढा सुरू असल्याचे सांगितले. समितीच्या स्थापनेमागील उद्देश आणि भूमिका समजून घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून मराठी जनता दरवर्षी १ नोव्हेंबरला काळा दिन पाळत असल्याचे सांगितले. सीमावासीयांच्या भावनांची दखल घेऊन केंद्र सरकारने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधी केवळ सत्तेला प्राधान्य देत असून मराठी भाषा व संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत आहेत. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याची ताकद महाराष्ट्र एकीकरण समितीतच आहे. त्यामुळे युवा पिढीने समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी सीमाभागातील मराठी जनता आजही अन्यायकारक परिस्थितीत जीवन जगत असल्याची भावना व्यक्त केली. मात्र, समाधानाची बाब म्हणजे युवा पिढी सीमाप्रश्नाच्या लढ्यात सहभागी होत आहे. ज्येष्ठांनी या तरुणांना पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढविणे गरजेचे आहे. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती समाजासमोर मांडून जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शुभम कांबळे, राजाराम देसाई, रामचंद्र गावकर, हणमंत जगताप, रविंद्र शिंदे, बाबुराव पाटील, आशिष कांबळे, गोपाळ हेब्बाळकर, भास्कर पाटील, कल्लाप्पा घाडी, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, जगन्नाथ बिर्जे आणि मारुती परमेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शंकर गवाडा, प्रकाश चव्हाण, रणजीत पाटील, प्रल्हाद मादार, नारायण कापोलकर, अमृत शेलार, मारुती गुरव, यशवंत पाटील, संतोष पाटील, महत्रू ढबाले, वसंत नवलकर, संजीव पाटील, मुकुंद पाटील, ज्योतिबा जगताप, रमेश धबाले, रामचंद्र गावकर, मन्याप्पा पाटील, नागेश भोसले, सदानंद कांबळे, पुंडलिक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




