बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदीच्या कुरुमाळ शिवारात घडलेली ही घटना केवळ एका म्हशीच्या मृत्यूची नाही… तर एका शेतकरी कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी आहे.
गौतम निंगो मागीलगेकर यांचा मुलगा नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाईपलाईन रस्त्यालगत नव्याने उभारलेल्या ट्रान्सफॉर्मरजवळ चरणाऱ्या म्हशीचा विद्युत खांबाला स्पर्श झाला… आणि क्षणार्धात ती जमिनीवर कोसळली.
म्हैस अशी का करते, हे पाहण्यासाठी राखणदार मुलाने तिला स्पर्श केला. त्यालाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने तो थोडक्यात बचावला.
पण शेतकऱ्याच्या कुटुंबाचा मात्र मोठा आधार गेला.

सुमारे दीड लाख रुपये किमतीची ही म्हैस एका वेळेला चार लिटर दूध देत होती. याच दुधाच्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
आता म्हैस गेली… उत्पन्नाचा स्रोतही गेला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले असून पंचनामा करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
एका शेतकऱ्याचा हा तोटा… भरून निघणार कसा?





