बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका हा जंगल आणि वन्यजीवांनी समृद्ध असला, तरी याच वन्यजीवांचा उपद्रव आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रानडुक्कर, गवे यांच्याकडून पिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडत असताना, आता माकडांचे कळपही शेतकऱ्यांच्या पिकांवर डल्ला मारू लागले आहेत. त्यामुळे पिकांचे संरक्षण करायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
खानापूर तालुक्यातील जांबोटी परिसरातील गोल्याळी येथे माकडांच्या कळपाने एका शेतकऱ्याच्या ऊस पिकात धुमाकूळ घातला आहे. शेतकरी भुजंग नागाप्पा गुरव यांच्या सर्वे क्रमांक ७५ मधील ऊस पिकाचे माकडांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. माकडांनी ऊस खाण्यासोबतच पिकाची नासधूस केल्याने जवळपास १० टन उसाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान ही खानापूर तालुक्यातील नवी समस्या नाही. जंगलालगतच्या भागातील शेतकऱ्यांना अनेकदा रानडुक्कर आणि गव्यांच्या उपद्रवाचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

मात्र आता माकडांच्या वाढत्या उपद्रवाची भर पडली आहे. दिवसा माकडांचे कळप शेतांमध्ये दाखल होत असून ऊस, फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याचे नवे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
गोल्याळी येथील घटनेनंतर वन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, तसेच शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, केवळ नुकसान झाल्यानंतर पंचनामा आणि भरपाई देण्यापेक्षा वन्यप्राण्यांकडून होणारा पिकांचा उपद्रव रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. रानडुक्कर आणि गव्यांच्या पाठोपाठ आता माकडांचाही त्रास वाढत असल्याने वन विभाग यावर काय उपाययोजना करणार, याकडे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





