बेळगाव लाईव्ह : भारताचे प्रतिनिधित्व करत खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील जलतरणपटू उत्कर्ष पाटील याने आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. Aichi-Nagoya 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कर्षने पुरुषांच्या 100 मीटर आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभाग घेत अनुक्रमे सातवा आणि आठवा क्रमांक मिळवला.
उत्कर्षचा लोकोळीपासून जपानपर्यंतचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. पदक मिळवता आले नसले तरी, भारतीय संघात स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवणे, हीच मोठी कामगिरी मानली जात आहे.
उत्कर्षने यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या स्पर्धेतही त्याने आपली कामगिरी कायम ठेवत पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले.

खानापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला उत्कर्षचा प्रवास आता थेट जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे लोकोळी, खानापूर आणि संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात पोहोचले आहे.
पदक हुकले असले तरी भारतीय संघाची जर्सी परिधान करून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणाऱ्या उत्कर्षच्या या प्रवासातून परिसरातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.





