बेळगाव लाईव्ह: चाळिशीनंतर अनेक महिलांना टाचदुखी, पाय दुखणे आणि सकाळी उठल्यानंतर पाय जमिनीवर ठेवताना होणाऱ्या तीव्र वेदनांचा त्रास जाणवतो. ही समस्या अनेकदा प्लँटर फॅशियायटिस (Plantar Fasciitis) मुळे उद्भवू शकते. याबाबत डॉ. सोनाली सरनोबत यांनी आरोग्य सत्रातून माहिती दिली.
पायाच्या तळव्याला आधार देणाऱ्या फॅशिया नावाच्या ऊतींवर ताण किंवा दाह निर्माण झाल्यास टाचदुखी होऊ शकते. विशेषतः फ्लॅट फूट म्हणजेच चपटे पाय असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा पाय जमिनीवर ठेवताना तीव्र वेदना होणे, टाचेपासून पोटरीपर्यंत दुखणे, पाय सरळ करताना त्रास होणे ही त्याची काही सामान्य लक्षणे आहेत.
अशा वेळी वेदना होत असतानाच अचानक वॉकिंग सुरू करणे टाळावे. दुखण्याचे कारण समजून घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घरातील काम करताना सतत उभे राहणे टाळावे तसेच योग्य पादत्राणांचा वापर करावा, असा सल्ला डॉ. सरनोबत यांनी दिला.
वॉकिंग सुरू करताना योग्य मापाचे आरामदायी शूज वापरणे, सपाट आणि समतल पृष्ठभागावर चालणे तसेच सुरुवातीला जास्त वेगाने किंवा जास्त इनक्लाइनवर चालणे टाळणे गरजेचे आहे.

याशिवाय आहारातून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 मिळण्याकडे लक्ष देणे आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
टाचदुखीचा त्रास वारंवार होत असल्यास स्वतःहून उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
केदार क्लिनिक डॉ सोनाली सरनोबत, for appointments
9964946918
9916106896





