बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याच्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वादातील न्यायालयीन कारवाईला आता पुढील टप्पा आला आहे. बेळगावच्या JNFC 2nd कोर्टात या प्रकरणातील चार आरोपींवर आज दोषारोपण (Charge Frame) करण्यात आले.
2017 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचा आदेश दिला होता. कर्नाटकातील तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
यानंतर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस प्रथमच बेळगाव बसस्थानकात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मदन बामणे, गणेश दडीकर, सूरज कणबरकर आणि मेघन लंगरखंडे यांनी बसचे स्वागत करत ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या.
या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात मदन बामणे, गणेश दडीकर, सूरज कणबरकर, मेघन लंगरखंडे यांच्यासह बसचे चालक देविदास हरी थोरात आणि वाहक प्रमोद शंकर गायकवाड यांच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम 143, 147, 153(A) आणि 149 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज झालेल्या सुनावणीत वरील चार जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपण निश्चित करण्यात आले. दरम्यान, बस चालक देविदास थोरात आणि वाहक प्रमोद गायकवाड यांची केस स्वतंत्र करण्यात आली असून त्यांच्या प्रकरणाची पुढील तारीख नोव्हेंबर 2026 मध्ये निश्चित करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे आणि अॅड. अश्वजीत चौधरी काम पाहत आहेत.





