बेळगाव लाईव्ह : २०१२-१३ च्या सुमारास बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या प्रकाश निकम यांनी तब्बल १४ वर्षांनंतर बेळगावचे नवे पोलीस आयुक्त म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी निकम यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
गुरुवारी दुपारी १२ वाजता प्रकाश निकम यांचे बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात आगमन झाले. यावेळी पोलिसांकडून त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी डीसीपी नारायण बरमनी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त प्रकाश निकम म्हणाले, “मी यापूर्वी बेळगावात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सुमारे सहा महिने काम केले आहे. त्यावेळी हे जिल्हा पोलीस क्षेत्र होते. आता येथे पोलीस आयुक्तालय झाले आहे. गेल्या काही वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे प्रथम सर्व अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.”
गणेशोत्सव शांततेत पार पाडणे प्राधान्य
बेळगावातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडणे हे आपले तातडीचे प्राधान्य असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.
“सध्या सर्वात मोठे आव्हान गणेशोत्सवाचे आहे. हा उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. स्थानिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या पूर्वीच्या बेळगावातील अनुभवाची आठवण करून देताना निकम म्हणाले, “बेळगावातील गणेशोत्सवाबाबत मला माहिती आहे. प्रशिक्षणार्थी असताना येथे बंदोबस्ताची जबाबदारीही पार पाडली आहे. त्यामुळे येथील उत्सवाची व्याप्ती आणि परिस्थितीची मला कल्पना आहे.”
सोशल मीडियावरही पोलिसांची नजर
गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून संवेदनशील किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जाण्याबाबत विचारले असता, सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“आमच्याकडे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे. प्रथम सर्व अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेईन. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यानुसार आवश्यक कारवाई केली जाईल. आम्ही कोणतेही ‘रॉकेट सायन्स’ करणार नाही; मूलभूत आणि शिस्तबद्ध पोलिसिंगच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देऊ,” असे निकम यांनी स्पष्ट केले.

भूषण बोरसे यांच्या चांगल्या कामांना पुढे नेणार
मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या कार्यकाळातील चांगल्या उपक्रमांचे सातत्य कायम ठेवण्याची ग्वाहीही निकम यांनी दिली.
“भूषण सरांनी अनेक चांगले बदल केले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या पायावर पुढील काम उभे करून ते अधिक पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक, सायबर गुन्हे आणि इतर पोलिसिंगशी संबंधित प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना इशारा
शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि राउडी घटकांबाबतही निकम यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“राउडी घटकांना राउडीगिरी थांबविण्याचा कडक सल्ला दिला जाईल. अन्यथा काय होऊ शकते, हे त्यांना माहीत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्कता आणि दक्षता आवश्यक आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, प्रकाश निकम यांच्या नियुक्तीपासूनच ते पदभार कधी स्वीकारणार, याबाबत चर्चा सुरू होती. गणेशोत्सवानंतर ते पदभार स्वीकारतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, गुरुवारी त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासाठी पोलिसांच्या वतीने निरोप समारंभही आयोजित करण्यात आला.





