बेळगाव लाईव्ह : निवडणुका वर्षभर पुढे ढकलल्या गेल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना अतिरिक्त संधी मिळण्यासारखे ठरेल, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. याला केवळ अतिरिक्त बोनस म्हणता येणार नाही, तर तो ‘बंपर’ बोनस असेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
एका पत्रकाराशी बोलताना जारकीहोळी यांनी दक्षिण भारताच्या राजकीय महत्त्वाचा मुद्दा मांडला. दक्षिण भारताचे नुकसान होऊ नये, ही आपली पहिली प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी दक्षिण भारताचे संख्याबळ वाढणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारताचे महत्त्व कमी होऊ नये, यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणासह दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व आणि संख्याबळ वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणत्याही पक्षाचे राजकारण न होता संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही अशा प्रकारची प्रक्रिया कोणताही गोंधळ न होता पार पडली होती, असे त्यांनी नमूद केले. आता आपल्या पक्षातील नेते याबाबत कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणुका कदाचित एक वर्षाने पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकाराने उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना जारकीहोळी यांनी याबाबत निश्चित माहिती नसल्याचे सांगितले. संबंधित प्रक्रियेत कोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट नसून पुढील मांडणीनंतरच चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
29 तारखेला निर्णय होतो की ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पुढे जाते, याची प्रतीक्षा करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकाराने निवडणुका पुढे गेल्यास मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार यांना एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळेल का, असा प्रश्न विचारला. त्यावर ‘अतिरिक्त बोनस नाही, तो बंपरच आहे,’ असे उत्तर देत जारकीहोळी यांनी उपस्थितांमध्ये हास्य निर्माण केले.
त्यांच्या या विधानामुळे निवडणुकांच्या संभाव्य वेळापत्रकासह राज्यातील राजकीय घडामोडींची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.




